चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३८ प्रवाशांचे प्राण वाचले
गंगापूर, (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर तालुक्यातील जुन्या कायगावजवळ शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास धाक्त्या एसटी बसचे चाक निखळल्याची घटना घडली. बसच्या उजव्या बाजूची चाके अॅक्सलमधून निखळल्याने बस सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. मात्र, चालक व्ही. के. शेळके यांनी प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने बसमधील ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र काही प्रवाशांना किरकोळ मुका मार लागल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी पावणेदोन वाजता निघालेली एसटी बस (क्र. एमएच १४ एमएच ७०२५) नेवासा फाटा, अहिल्यानगर, शिरूरमार्गे पुण्याकडे जात होती. ही बस शिरूर आगाराची असून, कांभी (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथील व्ही. के. शेळके हे बस चालवत होते, तर एकनाथवाडी (ता. पाथर्डी) येथील ए. एस. माने हे वाहक म्हणून कार्यरत होते.
बस जुन्या कायगावजवळ आली असता, गाव जवळ असल्याने तसेच गतिरोधकामुळे चालकाने बसचा वेग कमी केला होता. बस ताशी सुमारे ४० किलोमीटर वेगाने जात असतानाच पुढील उजव्या बाजूचे चाक अॅक्सलमधून निखळून रस्त्याच्या बाजूला पडले, त्यानंतर दुसऱ्या बाजूचेही चाक निखळल्याने बस अॅक्सलवर आदळत काही अंतर फरफटत गेली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला, प्रवाशांना दुसऱ्या बसने रवाना केले. घटनेनंतर बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर मागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसमधून त्यांना
पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, अपघातग्रस्त बस महामार्गावरच असल्याने ती क्रेनच्या साहाय्याने रात्री गंगापूर आगार डीपीमध्ये आणण्यात आला आहे. दरम्यान, गंगापूर आगाराचे आगारप्रमुख विजय बोरसे, बाहन परीक्षक व्ही. के. कुकलारे आणि हेड मेकॅनिक साठे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त बसची पाहणी केली, तसेच चालक व वाहकांकडून घटनेची माहिती घेत प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री केली.
वर्षभरापूर्वीच मिळाली होती नवीन बस विशेष म्हणजे, अपघातग्रस्त बस शिरूर आगाराला सुमारे वर्षभरापूर्वी मिळालेल्या नवीन लालपरी बसपैकी एक होती. नवीन बसचे अवध्या वर्षभरातच चाक अॅक्सलमधून निखळल्याने वाहनाच्या देखभाल - दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी महामंडळाच्या अधिकायांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तपासली जाते. ही बसदेखील तपासणीनंतरच मार्गावर रवाना झाली होती.
असे असतानाही ही घटना घडल्याने अपघाताचे नेमके कारण शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.













